स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कामगार आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना आणणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या भाषणाच्या अवघ्या 24 तासाच्या आत म्हणजे काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली असून,
ही योजना पंतप्रधान ‘विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ किंवा ‘पंतप्रधान विकास योजना’ या नावाने १७ सप्टेंबर २०२३ रोजी विश्वकर्मा पूजेच्या मुहूर्तावर संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. या विश्वकर्मा योजनेमध्ये 13 ते 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
काय आहे विश्वकर्मा योजना ?
विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेद्वारे कुशल कारागिरांना आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेद्वारे तरुणांना प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, ब्रँड प्रमोशन, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणे, डिजिटल पेमेंट आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
कोणाला मिळणार विश्वकर्मा योजनेचा लाभ ?
या योजनेचा सर्वाधिक अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला आणि दुर्बल घटकांना फायदा होणार आहे. यामध्ये सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
विश्वकर्मा योजनेचे वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत नागरिकांना मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे. तसेच आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकारकडून 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे.
याशिवाय एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. यावर कमाल पाच टक्के व्याजदर असणार आहे. तर एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.