बॉलिवूडचा ‘किंग’ खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा जवळपास दोन मिनिटांचा प्रीव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.

या व्हिडीओतील शाहरुखचे विविध लूक, धमाकेदार ॲक्शन सीन्स आणि दमदार कलाकारांची फौज पाहून ‘जवान’ च्या कथेविषयी चाहत्यांमध्ये औत्सुकता निर्माण झाली आहे. प्रीव्ह्यू व्हिडीओ पाहून हे सहज लक्षात येतं की शाहरुखचा हा चित्रपटसुद्धा बिग बजेटमध्ये बनला आहे. बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार यामध्ये झळकणार आहेत. दरम्यान या कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.

जवळपास 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने त्याची फी वाढवली आहे. म्हणूनच त्याने ‘जवान’ या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन स्वीकारले आहे. एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहून कमाईच्या 60 टक्के नफासुद्धा शाहरुख घेणार आहे.

पहा कोणाला किती मानधन मिळणार

नयनतारा – या चित्रपटातून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात तिचा जबरदस्त ॲक्शन अवतार पहायला मिळणार असून या भूमिकेसाठी तिने जवळपास 8 ते 11 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

विजय सेतुपती – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे विजय सेतुपती. विजयने सुरुवातीला या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये फी मागितली होती. मात्र ‘विक्रम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाल्यानंतर त्याने आपली फी वाढवली. त्यामुळे ‘जवान’ मधील भूमिकेसाठी त्याने 21 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. विजयच्या करिअरमधील हे सर्वाधिक मानधन असल्याचे म्हटले जात आहे.

सान्या मल्होत्रा – ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सान्या मल्होत्राने या चित्रपटातील भूमिकेसाठी दोन कोटी रुपये स्वीकारले आहेत.

प्रियामणी – ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीसुद्धा ‘जवान’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अटलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात ग्रॅमी पुरस्कार नामांकित आणि लोकप्रिय कलाकार राजा कुमारी यांचा ‘द किंग खान रॅप’ सुद्धा समाविष्ट आहे. जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *